
डोंबिवली, 05 ऑगस्ट (हिं.स.)। मीरा-भाईंदरजवळील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना लोकप्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून लोकप्रतिनिधींना लोकाभिमुख प्रशासन, विकासकामे आणि जबाबदारीची जाणीव याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसून जनतेचा सेवक असतो. पदाचा अहंकार न बाळगता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये वावरावे. नागरिकांच्या प्रत्येक फोनला प्रतिसाद देऊन त्यांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवाव्यात. संपत्तीपेक्षा माणसं कमवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा.
नगरसेवकांनी महापालिका अधिनियम, नगरसेवकांचे अधिकार व कर्तव्ये, अर्थसंकल्प, सभागृहाचे कामकाज, स्मार्ट सिटी, क्लस्टर डेव्हलपमेंट, पुनर्विकास, विषय समित्या, सोशल मीडिया, नागरिकांच्या तक्रारी, वाहतूक व्यवस्था, रिंगरोड, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास या विषयांचा सखोल अभ्यास करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात संघर्ष नव्हे तर समन्वय आवश्यक असल्याचे सांगत अधिकारी हे विकास प्रक्रियेतील सहकारी असून नियम समजून सकारात्मक संवादातून काम केल्यास शहराच्या विकासाला अधिक गती मिळते, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
या शिबिराला माजी खासदार तथा शिवसेना महाराष्ट्र संघटन प्रमुख आनंद परांजपे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, गटनेते विश्वनाथ राणे, सूरज आव्हाड, डॉ. प्रकाश आवाडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि शिवसैनिक उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi