
पुणे, 05 ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यातील देवाची उरुळी आणि फुरसुंगी येथे कचरा डेपोसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याच्या प्रकरणात न्यायालयाने पुणे महापालिकेविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. प्रलंबित मोबदल्याची रक्कम अदा न केल्यामुळे न्यायालयाने महापालिका आयुक्त कार्यालयातील खुर्चीसह इतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी संबंधित शेतकऱ्यांना तातडीने मोबदल्याची रक्कम अदा करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांना सादर केले. यावेळी नगरसेवक सुनील पांडे उपस्थित होते. साळेगावकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असून न्यायालयाने आयुक्त कार्यालयातील खुर्ची व इतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु