'वाहन' पोर्टलमधील बदलांवर वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघाचा आक्षेप
पुणे, 05 ऑगस्ट (हिं.स.)। परिवहन विभागाच्या ''वाहन'' पोर्टलमध्ये करण्यात आलेल्या नव्या बदलांमुळे वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, कर्जनोंद आणि इतर ऑनलाइन सेवांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य मोटार वाहन मालक-चालक प्रतिनिधी
'वाहन' पोर्टलमधील बदलांवर वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघाचा आक्षेप


पुणे, 05 ऑगस्ट (हिं.स.)।

परिवहन विभागाच्या 'वाहन' पोर्टलमध्ये करण्यात आलेल्या नव्या बदलांमुळे वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, कर्जनोंद आणि इतर ऑनलाइन सेवांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य मोटार वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघाने केला आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी संघाने परिवहन आयुक्त आणि पुण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संघाच्या म्हणण्यानुसार, नव्या प्रणालीमुळे वाहनधारक, वाहन विक्रेते आणि आरटीओ एजंट यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अनेक व्यवहार रखडले आहेत. वाहन हस्तांतरणासाठी अर्ज करताना आधार कार्डवरील नाव आणि पत्ता आरटीओच्या नोंदीतील माहितीशी तंतोतंत जुळणे अनिवार्य करण्यात आले आहे. नावातील किरकोळ दुरुस्तीची सुविधा उपलब्ध असली तरी पत्त्यातील दुरुस्तीची सुविधा नसल्याने अनेक अर्ज प्रलंबित राहत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

यापूर्वी वाहन हस्तांतरण, कर्जनोंद किंवा कर्ज समाप्ती यांसारख्या प्रक्रिया एकाच अर्जातून पूर्ण होत होत्या. मात्र, नव्या प्रणालीमध्ये प्रत्येक सेवा स्वतंत्रपणे करावी लागत असून एकावेळी केवळ एकच प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व्यवहार पूर्ण होण्यास मोठा विलंब होत आहे. एक सेवा पूर्ण होऊन स्मार्ट कार्ड मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करता येत असल्याने पूर्वी १० ते १५ दिवसांत पूर्ण होणारे व्यवहार आता दोन महिन्यांपर्यंत लांबत असल्याचा दावा संघाने केला आहे.

तसेच वाहन हस्तांतरणाच्या वेळी नवीन मालकाचा भाडेकरार दुसऱ्या जिल्ह्यातील असल्यास अर्ज स्वीकारला जात नसल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे. या सर्व तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोटार वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघाने केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande