अवघ्या ३५० रुपयांमध्ये गणरायाच्या भेटीस; कुणबी युवा मंचाची विशेष बस सेवा
रायगड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।: गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कुणबी युवा मंच, मुंबई (रजि.) यांच्या वतीने मुंबई ते गाव विशेष एसटी बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षित, आरामदायी आणि परवडणाऱ्या दरात
Visit Lord Ganesha for just ₹350; Kunbi Yuva Manch's special bus service.


रायगड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।: गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कुणबी युवा मंच, मुंबई (रजि.) यांच्या वतीने मुंबई ते गाव विशेष एसटी बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षित, आरामदायी आणि परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला चाकरमान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, नवी मुंबई आणि परिसरातून मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. समाजबांधवांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांना सुरक्षित, वेळेवर आणि सुखकर प्रवास करता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

विशेष एसटी बस शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता मुंबईहून सुटणार असून रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता परतीचा प्रवास होणार आहे. या बसचा मार्ग सायन रुग्णालय – वाशी – नेरुळ – पनवेल – इंदापूर – माणगाव – लोणेरे – गोरेगाव – देवळी असा निश्चित करण्यात आला आहे.

या प्रवासासाठी प्रति प्रवासी ₹३५० इतकेच तिकीट शुल्क आकारण्यात येणार असून आधार कार्ड बंधनकारक राहणार आहे. बुकिंग रद्द केल्यास नियमानुसार ५० टक्के (₹१७५) रक्कम परत दिली जाणार आहे. या बससेवेला कोणतीही शासकीय सवलत लागू होणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

बसमधील जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुकिंगसाठी विनायक म्हरके (७०४५४६७०१५), नरेश भोसले (८३५६०५४७८९) आणि राजेश शिर्के (९९२३०७०२१९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना सुरक्षित, आनंददायी आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुणबी युवा मंचाने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अधिकाधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande