
वर्धा,, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
विद्यापीठ गीताच्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डसाठी महाविद्यालयाचा सक्रीय सहभाग
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची २०२५ साली विद्यापीठगीताच्या सामूहिक गायनासाठी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डसाठी नोंद झाली. यासाठी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हयातील महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये वर्धा जिल्ह्यातून सर्वांत जास्त सहभाग नोंदविल्याबद्दल विद्यापीठाद्वारे स्थानिक यशवंत महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०३ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूनानक भवन, विद्यापीठ परिसर, नागपूर येथे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, संगीत विभागप्रमुख प्रा. अरुणा हरले, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. रवींद्र बेले, भूगोल विभागप्रमुख डॉ. बुद्धघोष लोहकरे, मराठी विभागाचे प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. राहुल भालेकर, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप रायबोले, डॉ. प्रफुल्ल काळे, डॉ. अर्चना दुपारे यांनी १५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र या स्वरूपात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर होत्या. तसेच आमदार आशीष देशमुख, विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष रौलिंगसिंग खुराना, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. विजय खंडाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाच्या सक्रिय सहभागासाठी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख व विद्यमान अध्यक्ष समीर देशमुख यांचे मार्गदर्शन, तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाचे सहकार्य मोलाचे ठरले होते.
याकरिता मिळाला पुरस्कार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरने ११ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या 'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे' या प्रसिद्ध विद्यापीठ गीताच्या सामूहिक गायनातून गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड्स सह एकूण चार जागतिक विक्रम प्रस्थापित केले. या उपक्रमात ५२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. १५ हजारांपेक्षा जास्त जण प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित होते. १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून जोडले गेले होते. या गीताच्या सामूहिक गायनाला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डशिवाय एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्येही स्थान मिळाले आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम नागपूर येथे पार पडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी