
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न सभागृहा’चे ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजुरीसाठी सादर करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ११ आदर्श शाळा उभारण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
स्थायी समितीचे अध्यक्ष तथा सभापती दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांना गती देणे, कामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांना प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.शिक्षण विभागाच्या आढाव्यात प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले. या शाळांमध्ये आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आरोग्य विभागाच्या आढाव्यात सर्पदंश व रेबीज प्रतिबंधक उपाययोजना, ग्रामीण आरोग्य संस्थांमधील औषधसाठा तसेच औषधांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले.बैठकीत उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांनी जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न सभागृहा’चे ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ असे नामकरण करण्याचा ठराव सादर केला.
यावेळी जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. निधीचा योग्य वापर, कामांची गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.बैठकीच्या प्रारंभी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मागील स्थायी समिती बैठकीचे कार्यवृत्त मंजूर करण्यात आले तसेच शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके आणि शासन निर्णयांची नोंद घेण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड