पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना राज ठाकरे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.)। शिक्षण, सहकार, अर्थकारण, राजकारण ते क्रीडा क्षेत्रापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल तसेच पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे सोमवारी (४ ऑगस्
raj thackeray tribute late d y patil reflected on his contributions


मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.)। शिक्षण, सहकार, अर्थकारण, राजकारण ते क्रीडा क्षेत्रापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल तसेच पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे सोमवारी (४ ऑगस्ट) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील त्यांच्या यशवंत निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापुरात जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी सामाजिक माध्यमावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी पोस्ट प्रसिद्ध केली.

राज ठाकरे यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात म्हटले की, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं निधन झालं. शिक्षणक्षेत्रात संस्थाउभारणीचं मोठं काम करणाऱ्या या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.

ते पुढे म्हणाले की, डी. वाय. पाटील ज्या काळात राजकारण आणि समाजकारणात आले, तो काळ वेगळा होता. तो केवळ सत्तेचा नव्हता, तर संस्थात्मक उभारणीचा होता. ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी संस्थांचं जाळं वेगाने विस्तारत होतं आणि त्यातून राज्यातील मोठ्या भागात आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र त्याच काळात देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उच्च शिक्षणाच्या संस्था, विशेषतः अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी होती. आज पुणे, मुंबईसारख्या शहरांतील अनेक नामांकित महाविद्यालयांचा इतिहास ब्रिटिशकालापर्यंत पोहोचतो. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटींसारख्या संस्थांची स्थापना करून उच्च शिक्षणाचा भक्कम पाया घातला; पण इतक्या विशाल देशात व्यावसायिक शिक्षणाची मागणी प्रचंड वेगाने वाढत होती. ती गरज केवळ सरकारच्या बळावर पूर्ण होणं शक्य नव्हतं. आणि त्याही पेक्षा शिक्षणावरचा सरकारचा खर्च हा प्रत्येक दशकांत कमीच होत चालला आहे. त्यामुळे शिक्षणाचं खाजगीकरण हे अपरिहार्य होतं.

अशा वेळी डी. वाय. पाटील यांनी शिक्षणातील संस्थात्मक उभारणीचं मोठं काम हाती घेतलं. आदर्श परिस्थितीत प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण सरकारमार्फत उपलब्ध व्हायला हवं, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण वास्तव हे आहे की भारतात शिक्षणावरील सार्वजनिक खर्च दीर्घकाळ अपेक्षेपेक्षा कमीच राहिला. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्राने शिक्षणात पुढाकार घेऊन संस्था उभारण्याची गरज निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर डी. वाय. पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील आणि दत्ता मेघे यांच्यासारख्या नेत्यांनी शिक्षणक्षेत्रात उभारलेल्या संस्थांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवतं. गेल्या तीन-चार दशकांत डॉक्टर, अभियंते, संशोधक, उद्योजक आणि विविध क्षेत्रांत काम करणारे लाखो विद्यार्थी या संस्थांतून घडले. हे योगदान मोठं आहे.

एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाहीत तर त्याभोवती वसतिगृहं, रुग्णालयं, लहान उद्योग, वाहतूक व्यवस्था आणि रोजगाराचं संपूर्ण अर्थकारण उभं राहतं. एका संस्थेमुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो, हे जुन्या पिढीतील अनेक नेत्यांच्या मनात पक्कं रुजलेलं होतं. शिक्षण क्षेत्रात उभारलेल्या संस्था असोत किंवा नवी मुंबईतील स्टेडियम—दोन्हीकडे त्यांच्या विचारातील भव्यता आणि दीर्घकालीन दृष्टी स्पष्टपणे दिसून येते. राजकारणातून संस्था उभारून समाजावर दीर्घकालीन ठसा उमटवणाऱ्या पिढीतील ते अखेरच्या महत्त्वाच्या प्रतिनिधींपैकी एक होते. डॉ. डी. वाय. पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande