
ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर अवघ्या 2 दिवसात झाली कारवाई
कोलकाता, 06 ऑगस्ट (हिं.स.) : ध्वनी प्रदूषणाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत पश्चिम बंगाल पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत राज्यातील सुमारे 1500 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटविण्याची कारवाई केली. ही कारवाई राज्यातील ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांनुसार करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी किमान 1,279 मशिदी आणि 199 मंदिरांना लाऊडस्पीकर हटविण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यभरात ध्वनी प्रदूषणाविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व धार्मिक स्थळांवर कोणताही भेदभाव न करता समान निकषांनुसार कारवाई केली जात आहे. या मोहिमेद्वारे विविध धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनांना सार्वजनिक ध्वनिक्षेपक (पब्लिक अॅड्रेस सिस्टीम) काढून टाकण्यास तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
बंगाल ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 नुसार सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत सार्वजनिक लाऊडस्पीकर वापरण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच साउंड लिमिटरचा वापर करणे आणि ध्वनीची पातळी 50 ते 75 डेसिबलच्या निर्धारित मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान, अनेक मशिदी व मंदिर समित्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, स्थानिक पोलिसांनी त्यांना लाऊडस्पीकर हटविण्याबाबत तोंडी सूचना दिल्या असून यासंदर्भात कोणतेही लेखी आदेश देण्यात आलेले नाहीत.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी