
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पणजी, 06 ऑगस्ट (हिं.स.) : गोवा येथील 2013 मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 'तहलका'चे संस्थापक आणि माजी संपादक तरुण तेजपाल यांना दोषी ठरवले आहे. 2021 मध्ये गोवा सत्र न्यायालयाने दिलेला निर्दोष मुक्ततेचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. शिक्षेची घोषणा दुपारी 2.30 वाजता करण्यात येणार आहे.
हे प्रकरण नोव्हेंबर 2013 मधील असून, 'तहलका'च्या एका माजी महिला सहकाऱ्याने गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान तरुण तेजपाल यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता.
2021 मध्ये मापुसा सत्र न्यायालयाने तेजपाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, या निर्णयाविरोधात गोवा सरकारने बॉम्बे उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अपील दाखल केले होते.
न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जमसांडेकर यांच्या खंडपीठाने तरुण तेजपाल यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(एफ) आणि 376(2)(क) अंतर्गत बलात्कार तसेच लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरवले. याशिवाय, कलम 354-ए आणि 354-बी अंतर्गतही त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, खालच्या न्यायालयाचा निकाल आणि आदेश रद्द करण्यात येत असून, तरुण तेजपाल यांना दोषी ठरवण्यात येत आहे.----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी