
नवी दिल्ली, 06 ऑगस्ट (हिं.स.) : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक भोजशाळेतून सुमारे 100 वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये नेण्यात आलेली अकराव्या शतकातील देवी वाग्देवीची पांढऱ्या संगमरवरी दगडाची मूर्ती भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राजकीय प्रयत्नांना गती दिली आहे.
मध्यप्रदेश सरकारच्या विनंतीनंतर आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकार लंडनमधील संग्रहालयाशी सातत्याने संपर्कात आहे. भारताने 2014 नंतर 650 हून अधिक प्राचीन मूर्ती आणि ऐतिहासिक कलावस्तू परत आणण्यात यश मिळवले असून, वाग्देवीची मूर्तीही स्वदेशी परतल्यास या मोहिमेत आणखी एका महत्त्वपूर्ण यशाची नोंद होणार आहे. भोपाळ येथे आयोजित 4 दिवसीय ब्रिक्स संस्कृती कार्यगट आणि संस्कृती मंत्र्यांच्या बैठकीत धारच्या भोजशाळेशी संबंधित वाग्देवीच्या मूर्तीच्या पुनरागमनाचा मुद्दा हा प्रमुख स्थानिक आणि सांस्कृतिक विषय ठरणार आहे. औपनिवेशिक काळात चोरी, तस्करी किंवा बेकायदेशीररीत्या परदेशात नेण्यात आलेल्या मूर्ती, शिल्पकला आणि इतर प्राचीन कलावस्तू त्यांच्या मूळ देशांना परत मिळाव्यात, यासाठी ब्रिक्स देशांमध्ये प्रभावी जागतिक धोरण आणि सहकार्याची चौकट उभारण्याचा भारताचा प्रयत्न या परिषदेत असेल.मध्य प्रदेशासाठी हा केवळ आंतरराष्ट्रीय वारसा संरक्षणाचा विषय नसून भावनिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात ठेवलेली आणि देवी वाग्देवी म्हणून पूजली जाणारी ही मूर्ती अखेर धारमध्ये परत येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात केंद्रीय संस्कृती सचिव विवेक अग्रवाल यांनी सांगितले की, केंद्रीय संस्कृती मंत्रालयात सचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच मध्य प्रदेश सरकारने ब्रिटिश संग्रहालयात असलेली देवी वाग्देवीची मूर्ती भारतात परत आणण्याची विनंती केली होती. त्यानंतर आम्ही राजनैतिक तसेच संग्रहालय स्तरावर सातत्याने प्रयत्न करत आहोत.मध्य प्रदेश सरकारकडून विनंती प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकारने राजनैतिक आणि संस्थात्मक माध्यमांतून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी