
लखनऊ, 06 ऑगस्ट (हिं.स.) । उत्तर प्रदेशातील कुप्रसिद्ध माफिया अतीक अहमद यांच्या कुटुंबाशी संबंधित आणखी एक मोठी घटना गुरुवारी झाशीमध्ये घडली. प्राथमिक माहितीनुसार, अतीकचा धाकटा मुलगा अबान, जो झाशी तुरुंगात आपला भाऊ अली अहमदला भेटायला गेला होता, त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मित्र सोनू याचाही मृत्यू झाला, तर गाडीतील इतर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिल्ली गावात राष्ट्रीय महामार्गावर घडला.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक, बीबीजीटीएस मूर्ती यांनी पुष्टी केली की, पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिल्ली गावात झालेल्या रस्ते अपघातात माफिया नेता अतीक अहमद यांचा मुलगा आणि त्याचा मित्र सोनू यांचा मृत्यू झाला. तिन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे. प्रयागराजहून झाशीकडे जाणारी एक भरधाव वेगातील क्रेटा कार, पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिल्ली गावात अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारमधील सर्व प्रवाशांना वाचवले. सर्व जखमींना पूंछ येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे दोघांना मृत घोषित करण्यात आले. जखमींपैकी एकाने जे सांगितले, त्याने पोलिसांना धक्का बसला. त्याने सांगितले की, मृतांपैकी एक जण माफिया नेता अतीक अहमदचा सर्वात धाकटा मुलगा अबान होता. अपघाताची बातमी मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे