बलात्कार प्रकरणी तरुण तेजपालला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
पणजी, 6 ऑगस्ट (हिं.स.) : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तहलका मासिकाचे माजी संपादक-प्रमुख तरुण तेजपाल यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना दोन आठवड्यांच्या आत शरण येण्याचे निर्
तरूण तेजपालचा संग्रहित फोटो


पणजी, 6 ऑगस्ट (हिं.स.) : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तहलका मासिकाचे माजी संपादक-प्रमुख तरुण तेजपाल यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना दोन आठवड्यांच्या आत शरण येण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वी मे 2021 मध्ये गोवा येथील सत्र न्यायालयाने पुरेशा पुराव्यांचा अभाव असल्याचे नमूद करत तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर गोवा सरकारने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

हे प्रकरण नोव्हेंबर 2013 मधील आहे. तहलकाच्या एका महिला पत्रकाराने आरोप केला होता की, गोव्यात आयोजित 'थिंक फेस्ट' कार्यक्रमादरम्यान 7 आणि 8 नोव्हेंबरच्या रात्री हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी दोन वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना तरुण तेजपाल यांनी निकालाबाबत निराशा व्यक्त केली. आम्ही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. गेल्या 13 वर्षांपासून काही लोक राजकीय सूडबुद्धीने माझा पाठपुरावा करत आहेत. साडेसात वर्षे आम्ही खटला लढलो आणि सत्र न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले होते असे त्यांनी म्हटले.

उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की, सत्र न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांपेक्षा घटनेनंतर पीडितेच्या वर्तनावर अधिक भर दिला. तसेच, तेजपाल यांनी पाठविलेल्या माफीनाम्याच्या ई-मेलसारख्या महत्त्वाच्या पुराव्यांचे योग्य मूल्यमापन करण्यात आले नव्हते.

न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(f), 376(2)(k), 354A आणि 354B अंतर्गत तरुण तेजपाल यांना दोषी ठरवले आहे. ही कलमे बलात्कार, लैंगिक छळ आणि महिलेचे वस्त्रहरण करण्याच्या उद्देशाने हल्ला करण्याशी संबंधित आहेत.

सत्र न्यायालयाने 21 मे 2021 रोजी गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत असे नमूद करत तेजपाल यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली होती. मात्र, या निर्णयाला गोवा सरकारने उच्च न्यायालयात आव्हान देत, खालच्या न्यायालयाने पुराव्यांचे योग्य मूल्यमापन केले नसल्याचा तसेच पीडितेच्या साक्षीचा चुकीचा अर्थ लावल्याचा युक्तिवाद केला होता.

या प्रकरणात संबंधित महिला पत्रकाराने सर्वप्रथम तहलकाच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांना ई-मेलद्वारे तक्रार केली होती. त्यामध्ये त्यांनी लेखी माफी, संपूर्ण कर्मचाऱ्यांसमोर घटनेची कबुली आणि अंतर्गत लैंगिक छळ तक्रार समिती (आयसीसी) स्थापन करण्याची मागणी केली होती.

प्रकरण सार्वजनिक झाल्यानंतर गोवा पोलिसांनी स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, ई-मेल, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर तरुण तेजपाल यांना अटक करण्यात आली होती.-------------------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande