महिला व बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; पनवेलमधील घटनेने खळबळ
रायगड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। पनवेल शहरातील वाल्मिकी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयात १० वर्षीय अल्पवयीन मुलीशी कथित लैंगिक गैरवर्तन व विनयभंगाचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पनवेल महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्या
Issue of women's and child safety back in the spotlight; Incident in Panvel sparks alarm.


रायगड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। पनवेल शहरातील वाल्मिकी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयात १० वर्षीय अल्पवयीन मुलीशी कथित लैंगिक गैरवर्तन व विनयभंगाचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पनवेल महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याविरुद्ध पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसमुख हिम्मत वाघेला याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७४ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) अधिनियम २०१२ अंतर्गत कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, वाल्मिकी नगर परिसरात खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला आरोपीने अश्लील हावभाव करून सार्वजनिक शौचालयात बोलावल्याचा व तिच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सार्वजनिक शौचालये, उद्याने, शाळांच्या परिसरासह संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी, चारित्र्य पडताळणी आणि नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

नागरिकांनी महापालिकेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची तातडीने पोलिस पडताळणी व पुनर्पडताळणी करण्याची मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा, नियमित देखरेख, शाळा व सार्वजनिक शौचालयांजवळ विशेष सुरक्षा पथके तैनात करावीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. महिला व बालकल्याण विभागाने स्वतंत्र सुरक्षा आराखडा जाहीर करून संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून दोष सिद्ध होईपर्यंत आरोपीला कायदेशीरदृष्ट्या दोषी मानले जाऊ शकत नाही. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande