
नंदुरबार, ६ ऑगस्ट (हिं.स.) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहादा–धडगाव रस्त्यावर तलावडी शिवार व उपनदेव फाट्याजवळ धडक कारवाई करत ५९ लाख ८० हजार रुपये किमतीचा गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत दोन महिंद्रा बोलेरो वाहने ताब्यात घेण्यात आली असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या वाहनाचा चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक व्ही. ए. चौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा ते धडगाव रस्त्यावरून गोवा निर्मित मद्यसाठ्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दुय्यम निरीक्षक एस. एस. गोयेकर (भरारी पथक) आणि दुय्यम निरीक्षक अ. शां. गायकवाड (बीट क्रमांक २) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तलावडी शिवार व उपनदेव फाट्याजवळ सापळा रचला.
यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या दोन महिंद्रा बोलेरो वाहनांना अडवून तपासणी करण्यात आली. यामध्ये एका वाहनाचा क्रमांक एमएच-०५-बीडी-५०७ असून, दुसरे वाहन विनानंबर प्लेट होते. तपासणीदरम्यान वाहनांमध्ये लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या ‘रॉयल ब्लू मार्ट व्हिस्की’चे १८० मिली क्षमतेचे एकूण ४७० बॉक्स आढळून आले.
या प्रकरणी विनोद फुलजी मोरे (वय ३० वर्षे, रा. करणपुरा, ता. पानसेमल, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या वाहनाचा चालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ) (ई), ८०, ८१, ८३, ९८ (२) आणि १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागरिकांना आवाहन: अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर