
जळगाव, 06 ऑगस्ट (हिं.स.) शहरातील मेहरुण परिसरातील पिरजादे वाडा येथे गोवंशाची कत्तल करून गोमांसाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ८० किलो संशयित गोमांस जप्त केले. या कारवाईत धारदार शस्त्रे आणि वजनकाट्यासह एकूण १६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मेहरुण येथील पिरजादे वाड्यातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणी गोमांसाची विक्री सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ८० किलो संशयित गोमांस, सहा धारदार लोखंडी सुरे, एक कुऱ्हाड आणि वजनकाटा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १६,९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी युसूफ खान इस्माईल खान (५२), शफी शेख बाबुलाल कुरेशी (५२), शेख रईस शेख मुनाफ (४०) आणि शेख मुख्तार शेख बिस्मिल्ला (४२) या चौघांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अंमलदार रफियोद्दीन बागवान यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर