अकोला : विदेशात पळालेला फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर अटकेत
अविनाश राठोडला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी अकोला, ६ ऑगस्ट (हिं.स.) : अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तब्बल ६७ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विदेशात पळून गेलेल्या मुख्य आरोपी अविना
Photo


अविनाश राठोडला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

अकोला, ६ ऑगस्ट (हिं.स.) : अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तब्बल ६७ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विदेशात पळून गेलेल्या मुख्य आरोपी अविनाश अर्जुन राठोड याला अखेर अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बंजारा नगर येथील आत्माराम राठोड यांनी १२ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, अविनाश राठोड याने आपल्या एपीएस वेल्थ व्हेंचर शेअर मार्केट कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा आणि दरमहा ५ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले होते. या माध्यमातून फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांकडून एकूण ८९ लाख ५० हजार रुपये जमा करण्यात आले होते.

आरोपीने सुरुवातीला जानेवारी २०२३ पर्यंत सुमारे २२ लाख ५० हजार रुपये नफ्याच्या स्वरूपात परत केले. मात्र फेब्रुवारी २०२३ नंतर पैसे देणे बंद केले. उर्वरित ६७ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर आरोपीने टाळाटाळ करत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विदेशात पळून गेले होते. दरम्यान, पुण्यातील एका अन्य आर्थिक गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर खदान पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटद्वारे आरोपीचा ताबा घेत त्याला अकोला न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने आरोपीला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलिसांनी केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande