
अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.) | नांदगावपेठ येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (आरोग्य मंदिर) परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने तसेच परिसरात गवत व झुडुपे वाढल्याने डासांची उत्पत्ती होऊन संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ज्याठिकाणी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते, त्याच आरोग्य केंद्र परिसरात अस्वच्छतेचे चित्र दिसत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दररोज या आरोग्यकेंद्रात विविध आजारांवरील उपचारासाठी रुग्ण, गर्भवती माता, बालकांच्या लसीकरणासाठी येणारे पालक तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र परिसरात साचलेले पाणी, वाढलेले गवत आणि स्वच्छतेचा अभाव, यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत असून डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या मते, आरोग्यकेंद्र परिसराची नियमित साफसफाई, साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा आणि गवताची कापणी करणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ज्याठिकाणी आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश दिला जातो, त्याच ठिकाणी अस्वच्छता का?, असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करीत असून संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून परिसर स्वच्छ व सुरक्षित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
साचलेल्या पाण्याबाबत व आरोग्यकेंद्र परिसरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. लवकरच योग्य उपाययोजना करून परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात येईल. तसेच आरोग्यकेंद्र परिसराची नियमित स्वच्छता व गवत कापण्याचे कामही करण्यात येणार असून, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. असे नांदगावपेठ आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शेंडगे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी