गेवराईच्या नगराध्यक्षा गीता पवार यांना दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेचा अर्ज फेटाळला
बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिकेच्या नवनिर्वाचित भाजप नगराध्यक्षा गीता बाळराजे पवार यांच्याविरुद्धचा अपात्रतेचा अर्ज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ५ ऑगस्ट रोजी फेटाळला आहे. कायदेशीर तरतुदी आणि वैधानिक अटींची पूर्तता
अपात्रतेचा अर्ज फेटाळला


बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिकेच्या नवनिर्वाचित भाजप नगराध्यक्षा गीता बाळराजे पवार यांच्याविरुद्धचा अपात्रतेचा अर्ज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ५ ऑगस्ट रोजी फेटाळला आहे. कायदेशीर तरतुदी आणि वैधानिक अटींची पूर्तता होत नसल्याचा निष्कर्ष नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला असून, यामुळे गीता पवार यांना मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे.

गेवराई शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत संजय काळे यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियमातील कलम ४४ आणि ५५-अ अंतर्गत पवार यांच्या अपात्रतेची मागणी केली होती. याप्रकरणी फेब्रुवारी ते मे दरम्यान सुनावणी पार पडली. सुनावणीत गीता पवार यांच्या बाजूने उच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे दाखले देण्यात आले.

थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना कलम ४४ अंतर्गत अपात्र ठरवता येत नाही. तसेच, कलम ५५-अ नुसार कारवाईसाठी किमान ५० टक्के नगरसेवकांचे मागणीपत्र आणि पदावर अडीच वर्षे पूर्ण होणे आवश्यक असते. गीता पवार यांची निवड डिसेंबर २०२५ मध्ये झाल्याने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही आणि नगरसेवकांचे मागणीपत्रही प्राप्त झालेले नाही. या अटींची पूर्तता होत नसल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी हा अर्ज नामंजूर केला. या निर्णयानंतर आता तक्रारदाराच्या राजकीय पार्श्वभूमीची चर्चा रंगली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande