तिवस्यातल्या राजकारणात खरच होणार बदल?
अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.)। आ.राणांच्या त्या वक्तव्याने विद्यमान आ.राजेश वानखडेंच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह? तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते. त्यांची तिकीट कापण्याचे काम मी केले. मी जे बोलतो ते सत्य होत असते. तिवस्यात बदल निश्चित आहे, अस
तिवस्यातल्या राजकारणात खरच होणार बदल?


अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

आ.राणांच्या त्या वक्तव्याने विद्यमान आ.राजेश वानखडेंच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह?

तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते. त्यांची तिकीट कापण्याचे काम मी केले. मी जे बोलतो ते सत्य होत असते. तिवस्यात बदल निश्चित आहे, असे विधान आमदार रवी राणा यांनी व्यासपीठावरून जाहीरपणे केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार रवी राणा यांनी केलेल्या उपरोक्त वक्तव्याने तिवसा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यांच्या विधानाने भांजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली असून चर्चा सुरू झालेली आहे.

रवी राणांनी नेमका कोणाकडे इशारा केला, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांच्या वक्तव्याचा रोख विद्यमान आमदार राजेश वानखडे यांच्या दिशेने असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिवसामतदारसंघातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे, भाजपमध्येही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या हालचाली सुरू आहेत. आमदार प्रवीण पोटे-पाटील निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आमदार राजेश वानखडेही मतदारसंघात पूर्ण ताकदीने सक्रिय झाले आहेत. अशा वेळी रवी राणांचे हे वक्तव्य राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.राणांनी रविराज देशमुख भावी आमदार म्हणून एक पोस्ट ही शोषल मीडियावर व्हायरल केली आहे.

आ. रवी राणा यांनी सांगितले की, रविराज देशमुख हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. भाजपाची शून्यापासून त्यांनी सेवा केली आहे. निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनच त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. उल्लेखनीय असे की, त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपद भूषविले होते. मात्र अवघ्या एका वर्षात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्या वेळीही पक्षांतर्गत राजकारणाची चर्चा रंगली होती. आता रवी राणांनी तिकीट कापण्याचे काम. मी केले असे जाहीरपणे सांगितल्याने त्या चर्चांना पुन्हा खतपाणी मिळाले आहे. तिवस्यात बदल निश्चित आहे या आमदार रवी राणांच्या विधानामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तिवसा मतदारसंघात भाजपचे रविराज देशमुख यांचा नवा चेहरा मिळणार का ? तिवस्यात बदल निश्चित! या वक्तव्याचे पडसाद किती उमटतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे नक्ष लागले आहे.

शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी

रविराज देशमुख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच शुभेच्छुकांची गर्दी जमली होती. माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रताप अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी, रूपाली माथने, सुवर्णा वरखेडे नगरसेवक मिलींद बांबल यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande