जळगावात प्रेमसंबंधातून विवाहितेची हत्या; संशयिताला अटक
जळगाव, १५ सप्टेंबर (हिं.स.) : शहरातून बेपत्ता झालेल्या ३९ वर्षीय विवाहित कविता अरुण सुतार यांचे अपहरण करून पद्मालय परिसरातील निर्जन जंगलात नेऊन दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी न
प्रतिकात्मक लोगो


जळगाव, १५ सप्टेंबर (हिं.स.) : शहरातून बेपत्ता झालेल्या ३९ वर्षीय विवाहित कविता अरुण सुतार यांचे अपहरण करून पद्मालय परिसरातील निर्जन जंगलात नेऊन दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे (वय २९) याला अटक केली आहे. प्राथमिक तपासानुसार, जुन्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कविता सुतार या ८ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास मुलासाठी जेवणाचा डबा तयार करत होत्या. त्यांचा मुलगा आंघोळ करून बाहेर आल्यानंतर त्याला कविता घरात दिसून आल्या नाहीत. त्यांचा मोबाईल फोनही बंद येत असल्याने कुटुंबीयांनी शेजारी तसेच नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या कुठेही आढळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच मोबाईल कॉल डिटेल्सचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या तपासादरम्यान एरंडोल हद्दीतील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या पद्मालय परिसरातील घनदाट जंगलात कविता सुतार यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृतदेह सापडल्याने बेपत्ता महिलेच्या प्रकरणाला हत्येचे गंभीर वळण मिळाले.

तांत्रिक तपास आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे याचा माग काढला. त्याला जळगाव शहरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर जुन्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून कविता सुतार यांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना पद्मालयच्या जंगलातील निर्जनस्थळी नेऊन दगडाने डोके ठेचून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

-----------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande