
जळगाव, १५ सप्टेंबर (हिं.स.) : शहरातील जुने जळगाव परिसरातील तळेले कॉलनी येथे आई आणि तिच्या पाच वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हेमांगिनी निखील महाजन आणि त्यांचा पाच वर्षीय मुलगा शौर्य अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जुने जळगावजवळील तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौकाजवळ महाजन कुटुंबीय वास्तव्यास आहे. हेमांगिनी यांचे पती निखील महाजन हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे सेवेत असल्याची माहिती आहे. महाजन कुटुंबीय तळेले कॉलनीतील घराच्या तळमजल्यावर, तर निखील यांचे भाऊ अक्षय महाजन पहिल्या मजल्यावर राहतात.
दुपारच्या सुमारास हेमांगिनी या मुलगा शौर्य याच्यासह घरात होत्या. कुटुंबातील अन्य सदस्य वरच्या मजल्यावर होते. सायंकाळच्या सुमारास निखील महाजन यांच्या आई खाली आल्या. त्यांनी अनेकदा हाका मारूनही घरातून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना बोलावले असता ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांकडून घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
हेमांगिनी आणि त्यांचे कुटुंबीय परिसरातील नागरिकांशी मिळून-मिसळून राहत असल्याने या घटनेने स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आई-मुलाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शनिपेठ पोलीस सर्व शक्यता तपासत असून तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर