
बीड, १५ सप्टेंबर (हिं.स.) : नेकनूर येथील बालविवाह प्रकरणात अपहरणाचा बनाव रचल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पीडित मुलीने दिलेल्या जबाबातून तिच्या आई-वडिलांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित आरोपीकडे २ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १० हजार रुपये ऑनलाइन आणि १० हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. उर्वरित रक्कम न मिळाल्याने मुलीच्या अपहरणाची तक्रार करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना AHTU पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी परिसरातून मुलीची सुटका केली. तसेच संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
मुलीला बीड येथे आणल्यानंतर तिचा जबाब नोंदविण्यात आला. या जबाबातून प्रकरणातील काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांनाही या प्रकरणात आरोपी केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, बालविवाहाच्या पार्श्वभूमीवर अपहरणाच्या तक्रारीमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास करण्यात येत आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis