
गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व तज्ज्ञांचे मार्गदर्शन
नाशिक, १६ सप्टेंबर (हिं.स.) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा आणि विविध कौशल्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकसह राज्यातील पाच जिल्ह्यांत ‘आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
जिल्हा परिषद नाशिकच्या ‘ज्ञानयात्री’ शैक्षणिक सहल उपक्रमाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्यासह अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
‘आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी’मध्ये विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील तसेच जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला योग्य दिशा देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.
‘ज्ञानयात्री’तून ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अनुभव
‘ज्ञानयात्री’ उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचा अनुभव घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, इतिहास आणि संस्कृतीसह विविध क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. अनुभवाधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासा निर्माण होण्यास मदत होत असल्याचे सांगत मंत्री भुसे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी निफाड तालुक्यातील डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषेतून शैक्षणिक सहलीचा अनुभव कथन केला. या शाळेतील २० विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषा परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या यशाबद्दल मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना व्यापक व्यासपीठ मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, शिक्षक, पालक, प्रशासन आणि समाजातील विविध घटकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI