
बीड, 16 सप्टेंबर (हिं.स.)।
* जलनायक मयंक गांधींची जिल्हाधिकाऱ्यांशी जलसंधारण, क्रीडा आणि अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा
आगामी काळातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे संकट लक्षात घेता येणारे भीषण पाणीसंकट टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून जलसंधारणाची मुबलक कामे बीड जिल्ह्यात अगोदरच करण्यात आली आहेत. यापुढेही अनेक किमी नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम संस्थेने हाती घेतले असून, यामध्ये प्रशासकीय सहभाग वाढावा आणि व्यापक स्वरूपातील उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी ग्लोबल विकास ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन मिळून काम करणार असून, यासंदर्भात लवकरात कामाची दिशा ठरवली जाणार आहे. आज 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान आणि ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जलनायक मयंक गांधी यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने वर्षानुवर्षे वाहणाऱ्या हंगामी नद्यांचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे. जेणेकरून वाहणारे पाणी थांबेल आणि थांबलेले पाणी जमिनीत मुरेल अशा स्वरूपाचे कामे करणे अपेक्षित आहे. ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने करण्यात येणारे नदी पुनरुज्जीवनाचे काम अतिशय प्रभावी ठरत असून, ग्लोबल रिव्हर आक्वाशाफ्ट पद्धतीमुळे भूगर्भ जलसाठा वाढत आहे. आगामी काळात अल निनोचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे असून अगोदरच उपाययोजना केल्या तर जलसंकटावर मात करता येईल. या विषयावर आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करून निर्णय घेण्यात आले. दुष्काळावर मात करण्यासाठी मास्टर प्लॅन आखला जाणार असून, त्यावर जिल्हा प्रशासन आणि ग्लोबल विकास ट्रस्ट एकत्र स्वरूपात काम करणार आहेत. तसेच बीड जिल्ह्यातील खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळावा व त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टच्या प्रयत्नातून जे एस डब्लू फाउंडेशनच्या वतीने कबड्डी आणि कुस्तीच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे व्यापक स्तरावर आयोजन करण्यात येत असून, त्याद्वारे निवड झालेल्या खेळाडूंना जे एस डब्लू फाउंडेशन कडून प्रोत्साहन दिले जाणार असून, त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सिरसाळाच्या विकासाचे मुद्दे अजेंड्यावर!
सिरसाळा गावच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक मुद्द्यांवर ग्लोबल विकास ट्रस्टकडून काम केले जात आहे. पाणीप्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी संस्थेने दोन तलावांचे खोलीकरण केल्याने टंचाईमुक्त गाव झाले आहे. या तलावाच्या बाजूला नागरिकांसाठी मुक्त व्यायामशाळा उभारणीची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली असता त्यांनी या कामाला तत्काळ मंजुरी दिली आहे. तसेच येथे उद्यान निर्मिती व क्रीडांगण उभारणीसाठीच्या उपाययोजनांना गती येणार आहे. गावच्या स्वच्छतेसाठी घंटागाडी देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या आहेत.
भिलेगाव रस्त्याचा प्रश्न लागणार मार्गी!
कावळ्याची वाडी फाटा ते भिलेगाव रस्त्याचे कामकाज अनेक दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत होते. खराब अवस्थेतील रस्त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. यावर तत्काळ निर्णय घेऊन रस्त्याचे काम करावे अशी विनंती मयंक गांधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली असता त्यांनी तत्काळ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याशी फोनवर चर्चा करून तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis