परभणी-पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत गुरुवारी लाभार्थी मेळावा
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.) विश्वकर्मा पूजन दिन तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, परभणी यांच्या वतीने पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन उद्या गुरुवार (दि.17) रोजी क
परभणी-पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत गुरुवारी लाभार्थी मेळावा


परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.) विश्वकर्मा पूजन दिन तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, परभणी यांच्या वतीने पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन उद्या गुरुवार (दि.17) रोजी करण्यात आले आहे. हा मेळावा विश्वकर्मा सांस्कृतिक सभागृह, जुना पेडगाव रोड, परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास जिल्ह्यातील पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थी, बँकेकडून कर्ज मंजूर व वितरित झालेले लाभार्थी तसेच टूल किट (साहित्य संच) प्राप्त झालेले लाभार्थी सहभागी होणार आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिक कारागीर व हस्तकला व्यवसाय करणाऱ्या घटकांना आर्थिक सहाय्य, कौशल्यविकास, आधुनिक साधनसामग्री तसेच बँक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे, क्षेत्रीय पातळीवरील लाभार्थ्यांच्या गरजा जाणून घेणे तसेच त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, बँक अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी तसेच पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना टूल किट (साहित्य संच) व कर्ज मंजुरीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहून योजनेच्या पुढील टप्प्यातील लाभांसाठी आवश्यक मार्गदर्शन व माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande