
नाशिक, 16 सप्टेंबर (हिं.स.)।
: बहुचर्चित व राज्यभर गाजलेल्या प्रकरणातील संशयित आरोपी भोंदू अशोककुमार खरात यास महिलांचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक फसवणुकीच्या विविध गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. तो सध्या मध्यवर्ती कारागृहात असून त्याच्यावतीने एका गुन्ह्यात जामीन अर्ज नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी (दि. १६) सुनावणी होणार होती; मात्र नियमित कोर्ट रजेवर असल्याने ही सुनावणी ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे न्यायालयात उपस्थित होते.
महिलांवरील लैंगिक अत्याचार व जादूटोणाप्रकरणी एकापेक्षा अधिक गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या भोंदू अशोक एकनाथ खरात (६७, रा. कर्मयोगीनगर) हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या गुन्ह्याचा तपास करत न्यायालयात एकूण आठ दोषारोपपत्रे दाखल केली आहेत. त्यापैकी सहा दोषारोपपत्रे ही जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग झाली आहेत. वर्ग झालेल्या दोषारोपपत्रांपैकी एका अजामीनपात्र गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात यावा, यासाठी खरातमार्फत वकिलांनी जामीन अर्ज दाखल केलेला आहे. या जामीन अर्जावर गेल्या ३० ऑगस्टला झालेल्या सुनावणीप्रसंगी सरकारपक्षाकडून उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत खरात यास जामीन मंजूर केला जाऊ नये, याबाबत कारणमीमांसा करत सविस्तर पुराव्यासह न्यायालयाला खुलासा सादर केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI