वर्धा : वाघाच्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबाला ५३ लाखांची मदत
मुलाला वन विभागात वन मजूर म्हणून नोकरी देणार वर्धा, १६ सप्टेंबर (हिं.स.) : बोर अभयारण्याच्या बफर झोनमधील रायपूर जंगली गावात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकरी भगवान धुर्वे यांच्या कुटुंबीयांना अखेर ५३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय
बोर अभयारण्य वाघ हल्ला प्रकरण: गावकऱ्यांच्या वज्रमुठीपुढे प्रशासन झुकले! ५३ लाखांची भरपाई; आज झाला भगवान धुर्वे यांच्यावर अंत्यसंस्कार


मुलाला वन विभागात वन मजूर म्हणून नोकरी

देणार

वर्धा, १६ सप्टेंबर (हिं.स.) : बोर अभयारण्याच्या बफर झोनमधील रायपूर जंगली गावात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकरी भगवान धुर्वे यांच्या कुटुंबीयांना अखेर ५३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच त्यांच्या मुलाला वन विभागात ‘वन मजूर’ म्हणून रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर प्रशासन आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चर्चेत हा तोडगा निघाला.

भगवान धुर्वे ९ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. यावेळी झुडपात लपलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले. परिसरात वाढलेले वन्यप्राण्यांचे हल्ले आणि शेतकऱ्याचा मृत्यू यामुळे ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आंदोलन सुरू केले.

गावाचे पुनर्वसन, कुटुंबीयांना नोकरी अथवा एक कोटी रुपयांची भरपाई, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या. सामाजिक कार्यकर्ते अभ्युदय मेघे आणि खासदार अमर काळे यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांना पाठिंबा दिला.

सहा दिवस आंदोलन

गावात १०, ११ आणि १२ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर १३ सप्टेंबरपासून हे आंदोलन वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाच्या स्वरूपात सुरू झाले. महिलांसह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री रणजीत कांबळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदिले यांच्या पुढाकाराने आमदार रोहित पवार यांनी १५ सप्टेंबर रोजी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी वनमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले.

मदतीचे स्वरूप

१५ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत झालेल्या बैठकीनंतर प्रशासनाने आर्थिक मदतीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मदतीचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे

वन विभाग नियमानुसार मदत — २५ लाख रुपये

आदिवासी विकास विभाग विशेष निधी — १० लाख रुपये

वन विभाग अतिरिक्त विशेष निधी — १० लाख रुपये

निखिलस बिनव्याजी रोजगार योजना — ७.५० लाख रुपये

महसूल विभाग तात्काळ मदत — ५० हजार रुपये

एकूण मदत — ५३ लाख रुपये

याशिवाय भगवान धुर्वे यांच्या मुलाला वन विभागात वन मजूर म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

हिंगणी रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी धुर्वे कुटुंबीयांना तात्काळ तीन धनादेश सुपूर्द केले. खासदार अमर काळे यांनी पत्रकार परिषदेत या तोडग्याची माहिती देत धुर्वे कुटुंबीयांनी तोडग्यास मान्यता दिल्याचे सांगितले.

अखेर अंत्यसंस्कार

प्रशासनाने मदतीचा निर्णय घेतल्यानंतर सहा दिवसांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत रायपूर जंगली येथे भगवान धुर्वे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande