
चंद्रपूर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहाखातर चंद्रपूर येथे सुमारे तीन लाख शोषित व पीडित समाजबांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक घटनेमुळे चंद्रपूरचे नाव बौद्ध संस्कृतीच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळाले असून, आंबेडकरी चळवळीतही या घटनेला विशेष महत्त्व आहे.
चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विविध मागण्यांसाठी संत सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या सहकार्याने मंगळवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून हजारो बौद्ध बांधव मोर्चात सहभागी झाले. मुख्य मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले.
व्यवस्थापन समितीत समाजाच्या प्रतिनिधींची मागणी
चंद्रपूर दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या व्यवस्थापन समितीत एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश नसावा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. समितीत बौद्ध व आंबेडकरी समाजातील प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार मंडळांच्या अध्यक्षांचा समावेश करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी परत न जाता त्याचा योग्य पद्धतीने वापर करून विकासकामे करण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात आली. तसेच ऐतिहासिक विहाराची मूळ रचना कायम ठेवूनच त्याचे नूतनीकरण करावे. महानगरपालिका, चंद्रपूरकडून मंजूर करण्यात आलेल्या मूळ वास्तूमध्ये कोणताही अनावश्यक बदल करू नये, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी मांडली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेत लवकरच संबंधितांची बैठक आयोजित करून मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या आक्रोश मोर्चात प्रतीक डोलिकर, ॲड. राजस खोब्रागडे, लुंबिनी गणवीर, ॲड. प्रियंका चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव