शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जासाठी मुदतवाढ
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। समाज कल्याण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत नूतनीकरणाचे ऑनलाईन अर्ज
शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जासाठी मुदतवाढ


परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

समाज कल्याण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत नूतनीकरणाचे ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

सीईटी सेलमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता यावा, यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाच्या याद्या ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. वसतिगृह प्रवेशासाठीचे ऑनलाईन अर्ज https://hmasnew.mahait.org/ या पोर्टलवर स्वीकारण्यात येत आहेत.

सन २०२५-२६ या मागील आर्थिक वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या आणि सन २०२६-२७ या वर्षासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना नूतनीकरणाचे ऑन आहेलाईन अर्ज भरण्यासाठीही ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नूतनीकरणाच्या ऑनलाईन अर्जामध्ये विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करण्याची तसेच चालू अभ्यासक्रमाची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच, सन २०२५-२६ मध्ये अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या आणि स्वाधार योजनेचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ मध्ये शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता यावा, यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त एडके यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande