
लातूर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही थकबाकीदार शेतकऱ्यांप्रमाणे शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ प्रोत्साहनपर अनुदान न देता सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान तसेच कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खंडाळी येथे चेअरमन व्यंकटराव पाटील अन्नत्याग उपोषण करणार आहेत.
या आंदोलनाला धसवाडीचे चेअरमन गोविंद पवार, व्यंकटराव सुरकुटे, मारोतराव तरडे, किशोर खाकरे, मोतीराम जायभाये यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन, संचालक व पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलनात सहभागी होण्याचा इशाराही संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाची भूमिका काय राहणार, याकडे तालुक्यातील शेतकरी व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis