मानवत ग्रामीण रुग्णालयातील गणेशोत्सव देखाव्यातून सार्वजनिक आरोग्य सेवांची माहिती
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘आरोग्यदूत गणराया... निरोगी महाराष्ट्राची वाटचाल’ या संकल्पनेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. धार्मिक उत्सवाला सामाजिक जनजागृतीची जोड देत या
अ


परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘आरोग्यदूत गणराया... निरोगी महाराष्ट्राची वाटचाल’ या संकल्पनेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. धार्मिक उत्सवाला सामाजिक जनजागृतीची जोड देत या देखाव्यातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजना, आरोग्य सुविधा आणि रुग्णालयातील उपलब्ध सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.

देखाव्याच्या मध्यभागी श्री गणरायाची मूर्ती विराजमान असून, त्यांच्या साक्षीने शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि आरोग्य राज्यमंत्र्यांची छायाचित्रे तसेच ग्रामीण रुग्णालयातील विविध विभागांची माहिती या देखाव्यात समाविष्ट करण्यात आली आहे. मातृत्व व बाल आरोग्य, महात्मा फुले जनआरोग्य योजना, क्षयरोगमुक्त भारत अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, असंसर्गजन्य आजार विभाग, आयुष्मान आरोग्य मंदिर, व्यसनमुक्ती अभियान, मानसिक आरोग्य सेवा, रक्तदान व अवयवदान जनजागृती, स्वच्छता व आरोग्य तसेच एकात्मिक सल्ला व समुपदेशन केंद्र आदी योजनांची माहिती या माध्यमातून देण्यात आली आहे.

ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या विविध सेवांवरही देखाव्यात विशेष भर देण्यात आला आहे. यात 102 व 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा, दर मंगळवारी गर्भवती मातांची तपासणी, आवश्यक गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी, बालकांचे नियमित लसीकरण, नेत्र तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार, क्षयरोग निदान, डिजिटल एक्स-रे व ऑनलाइन रिपोर्ट सेवा, रक्त व लघवीच्या 76 प्रकारच्या मोफत तपासण्या, जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी तसेच सुमारे 274 प्रकारच्या औषधांचे मोफत वितरण आदी सेवांची माहिती देण्यात आली आहे. आंतररुग्ण व प्रसूती मातांसाठी उपलब्ध सकस आहार व्यवस्थेची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे.

‘आम्ही आरोग्य सेवेचे सेवेकरी’ हा संदेश या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आला आहे. नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती मिळावी, उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकी जपणारा हा देखावा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासनाच्या सेवाभावी कार्याचे दर्शन घडवित आहे. नागरिकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande