परभणी येथे डाक जीवन विमा योजनेसाठी सोमवारी मुलाखती
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी डाक विभागामार्फत डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेंतर्गत विमा सल्लागार पदासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून सोमवार (दि.२१) रोजी सकाळी १०
परभणी येथे डाक जीवन विमा योजनेसाठी सोमवारी मुलाखती


परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

परभणी डाक विभागामार्फत डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेंतर्गत विमा सल्लागार पदासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून सोमवार (दि.२१) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी-४३१४०९ येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

या पदासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदाराने केंद्र अथवा राज्य शासनाची मान्यता असलेल्या मंडळाची इयत्ता १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

बेरोजगार किंवा स्वयंरोजगार व्यक्ती, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत सदस्य यांनाही अर्ज करता येतील.

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून, त्यामध्ये व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विम्याबाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक भागाची माहिती आदी बाबींचा विचार करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारास ५ हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात परवाना देण्यात येईल. त्यानंतर आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर हा परवाना कायमस्वरूपी परवान्यात रूपांतरित करण्यात येईल. सदर परीक्षा तीन वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. ही नियुक्ती लायसन्स व कमिशन तत्त्वावर राहणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी डाकघर अधीक्षक कार्यालय, परभणी विभाग, परभणी येथे उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज भरून, बायोडाटा, मूळ कागदपत्रे, आवश्यक प्रमाणपत्रे तसेच अनुभव प्रमाणपत्रे सोबत घेऊन दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande