करजगावातील चिंचोक्यांच्या गणपतीची ८७ वर्षांची परंपरा
अमरावती, १६ सप्टेंबर (हिं.स.) : गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक ठरलेल्या करजगावातील चिंचोक्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गणपतीने यंदा ८७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. लोखंडीपुरा येथील श्री गजानन महाराज संस्थानमध्ये विराजमान होणारी ही गणेशम
करजगावातील चिंचोक्यांच्या गणपतीने गाठले 87 वे वर्ष!


अमरावती, १६ सप्टेंबर (हिं.स.) : गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक ठरलेल्या करजगावातील चिंचोक्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गणपतीने यंदा ८७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. लोखंडीपुरा येथील श्री गजानन महाराज संस्थानमध्ये विराजमान होणारी ही गणेशमूर्ती केवळ भक्तीचे केंद्र नसून ग्रामीण भागातील पारंपरिक हस्तकलेचा अनोखा वारसा जपणारा ठेवा म्हणून ओळखली जाते.

चिंचोके, कागदाचा लगदा, सिरस, ताग आणि माती यांचा वापर करून साकारण्यात आलेली ही गणेशमूर्ती देशातील दुर्मिळ मूर्तींपैकी एक मानली जाते. आठ दशकांहून अधिक काळापासून ही परंपरा अखंड सुरू असून, गणेशोत्सवाच्या काळात या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

रायजीबाईंच्या प्रेरणेतून साकारली मूर्ती

या गणपतीमागेही एक रंजक इतिहास आहे. करजगाव येथील रायजीबाई खेडे यांनी शिरजगाव कसबा येथे पाहिलेल्या आकर्षक गणेशमूर्तीपासून प्रेरणा घेतली. त्यानंतर मूर्तिकार गंगाराम वांगे आणि त्यांचे शिष्य बळीराम कविटकर यांनी चिंचोक्यांचा वापर करून ही अनोखी गणेशमूर्ती साकारली.

१५ सप्टेंबर १९३९ रोजी ही मूर्ती श्री गजानन महाराज संस्थानला दान करण्यात आली. तेव्हापासून ही मूर्ती गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरली आहे.

महाबली हनुमान आणि गरुडाच्या मूर्तीही

विशेष म्हणजे चिंचोक्यांपासून तयार करण्यात आलेल्या महाबली हनुमान आणि गरुडाच्या मूर्तीही संस्थानमध्ये आहेत. या तीनही मूर्ती गुरु-शिष्यांच्या कलाकौशल्याचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. वर्षभर मंदिरात विराजमान असलेल्या या मूर्तींपैकी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत गणपतीची मूर्ती विशेष सजावटीसह मंडपात प्रतिष्ठापित केली जाते.

तृतीयपंथीयांच्या सहभागाचीही परंपरा

पूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत तृतीयपंथीयांचा सहभाग हे या उत्सवाचे विशेष आकर्षण होते. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये आणि भक्तिमय वातावरणामुळे विसर्जन मिरवणूक गावातील प्रमुख आकर्षण ठरत असे. काळाच्या ओघात उत्सवाच्या स्वरूपात काही बदल झाले असले, तरी या परंपरेची ज्योत आजही तेवती आहे.

८७ वर्षांचा इतिहास लाभलेल्या या चिंचोक्यांच्या गणपतीने करजगावची ओळख जिल्हाभर पोहोचवली आहे. कला, श्रद्धा आणि परंपरेचा हा अनमोल वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य आजही सुरू असून, यंदाच्या ८७ व्या वर्षानिमित्त भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande