
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.) जिंतूर तालुक्यातील लिंबाळा परिसरात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर संकट ओढवले आहे. पुरेशा पावसाअभावी सोयाबीनची वाढ खुंटली असून अनेक शेतांमध्ये पीक वाळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
लिंबाळा येथील शेतकरी दिनकर एकनाथराव दराडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पावसाअभावी मोठ्या प्रमाणात हानी झाली. पीक उत्पादन देण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांनी अखेर आपल्या जनावरांना सोयाबीनच्या शेतात सोडले. उत्पादनाऐवजी चारा म्हणून पीक वापरण्याची वेळ आल्याने पावसाअभावी शेतकर्यांवर ओढवलेल्या संकटाची तीव्रता स्पष्ट होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या काळात अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. परिणामी पिकाची वाढ खुंटली असून पाने वाळू लागली आहेत. शेंगा भरण्याच्या प्रक्रियेवरही त्याचा परिणाम झाला आहे. काही शेतांमध्ये उत्पादनातून लागवडीचा खर्चही निघण्याची शक्यता कमी झाली आहे. पेरणीपासून बियाणे, खते, औषध फवारणी, मशागत यासाठी केलेला खर्च पिकाच्या नुकसानीमुळे वाया जाण्याची भीती शेतकर्यांना आहे. त्यामुळे लिंबाळा परिसरातील शेतकर्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
दरम्यान, प्रशासनाने लिंबाळा परिसरातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, बाधित शेतकर्यांना पीकविमा व शासकीय मदतीचा लाभ मिळवून द्यावा, तसेच पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी शेतकरी दिनकर एकनाथराव दराडे यांनी शासनाकडे केली आहे. खरीप हंगाम हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis