रायगड : भरती परीक्षा सुधारणांसाठी उमेदवारांना अभिप्रायाची संधी
रायगड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। : भरती परीक्षेतील गैरप्रकार, पारदर्शकतेचे प्रश्न आणि उमेदवारांच्या अडचणींवर आता थेट शासनाच्या उच्चस्तरीय समितीसमोर आवाज उठविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उ
Opportunity for candidates to provide feedback on recruitment exam reforms


रायगड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। : भरती परीक्षेतील गैरप्रकार, पारदर्शकतेचे प्रश्न आणि उमेदवारांच्या अडचणींवर आता थेट शासनाच्या उच्चस्तरीय समितीसमोर आवाज उठविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती कोकण विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, तज्ज्ञ आणि नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागवत आहे.

उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व सदस्य २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील चेतना कॉलेज येथे भेट देणार आहेत. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाजवळील सर्व्हे क्रमांक ३४१, चेतना महाविद्यालय मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे ही भेट होणार आहे.

समितीसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी १५ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लेखी निवेदन, सूचना, अभिप्राय किंवा समितीच्या भेटीसाठी वेळ मागणारे पत्र सादर करता येणार आहे. इच्छुकांनी अपर जिल्हा उपजिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, नववा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत प्रत्यक्ष निवेदन द्यावे.

याशिवाय konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवरही निवेदन अथवा अभिप्राय पाठविता येईल.भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी उमेदवार व संबंधित घटकांनी आपल्या सूचना आणि अडचणी स्पष्टपणे समितीसमोर मांडाव्यात, असे आवाहन कोकण विभागाच्या उपसंचालक (माहिती) यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande