
नाशिक, १६ सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक रोड विभागीय कार्यालयातील कारभारावरून महासभेत तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर विभागीय अधिकारी डॉ. प्रज्ञा त्रिभुवन यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संबंधित विभागातील अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, शहरातील अपघातांच्या प्रकरणांत वारंवार सूचना देऊनही निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर तांत्रिक तपासणीनंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही महापौरांनी प्रशासनाला दिले.
नाशिक महानगरपालिकेची महासभा महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडनमध्ये मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते आणि अन्य सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर महापालिकेचे माजी आरोग्य अधिकारी डॉ. पलोड यांच्यासह अन्य दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.
कमी दाबाच्या, गढूळ पाणीपुरवठ्यावरून नगरसेवक आक्रमक
सभेच्या सुरुवातीलाच सिडको प्रभागातील नगरसेवकांनी कमी दाबाने होणाऱ्या तसेच गढूळ पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरले. प्रभाग क्रमांक २८, २९, ३० आणि ३१ मधील पाणीप्रश्नावरून नगरसेविका छाया देवांग यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सभागृहात फ्लेक्स बॅनर झळकावत प्रशासनाचे लक्ष वेधले.
नगरसेवक रिकाम्या घागरी, पाण्याच्या बादल्या आणि जार घेऊन सभागृहात दाखल झाले. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. यावर महापौरांनी प्रशासनाला संबंधित समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
नाशिक रोड विभागीय कार्यालयाच्या कारभाराची चौकशी
नाशिक रोड प्रभाग समितीच्या बैठकीतील कारभार तसेच अतिक्रमण विभागाच्या कामकाजावरून मागील काही दिवसांपासून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर कैलास मुदलियार, नगरसेविका भारती ताजनपुरे, भारती ताजणे, सभापती रमेश धोंगडे आदींनी हा मुद्दा महासभेत उपस्थित केला.
यावर प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महापौरांनी विभागीय अधिकारी डॉ. प्रज्ञा त्रिभुवन यांची नाशिक रोड प्रभाग समिती कार्यालयातून तातडीने बदली करण्याचे निर्देश दिले. त्या शासन सेवेत प्रतिनियुक्तीवर असल्यास त्यांना शासन सेवेत परत पाठविण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले. अतिक्रमण विभागातील कर्मचारी पवार यांचीही बदली करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
सिद्धार्थ गोरे अपघातप्रकरणी ठेकेदारांवर कारवाईचे निर्देश
महासभेत सिद्धार्थ गोरे या युवकाच्या अपघाती मृत्यूचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावेळी महापौरांनी संबंधित ठेकेदारांना यापूर्वी अनेक वेळा सूचना देऊनही निष्काळजीपणा सुरूच असल्यास तांत्रिक बाबींची तपासणी करून दोषींवर तातडीने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
ठेकेदारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये आणि दुर्घटनांच्या प्रकरणांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, असेही निर्देश देण्यात आले.
दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या भेटी घेणार
नाशिक शहरात संपूर्ण एक महिना ‘सेवा सप्ताह’ म्हणून राबविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.
तसेच नाशिक शहरातील नागरिकांचा अपघाती विमा काढण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI