
लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेमुक्त व ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासोबतच पारंपरिक वाद्यांचे संवर्धन करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिविक्षाधिन डीवायएसपी अक्षय जाधव यांच्या संकल्पनेतून शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ध्वनप्रिदूषणाला (डीजे) नकार, पारंपरिक वाद्यांचा स्वीकार : संस्कृती संवर्धनाची नवी दिशा' या विषयावर झालेल्या या स्पर्धेत तब्बल २ हजार ४८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले.
निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पोलिस ठाणे शिरूर अनंतपाळच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. यावेळी स्पर्धेतील पाच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच १७ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षस्थानी आदर्श से.नि. शिक्षक विलास हासबे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी राजेंद्र मायणे (चाकूर), डीवायएसपी अक्षय जाधव शिरूर अनंतपाळ आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी निबंधातून ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम, डीजेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, पर्यावरण व आरोग्यावर होणारे परिणाम तसेच पारंपरिक वाद्यांचे सांस्कृतिक महत्त्व यावर आपले विचार मांडले. यावेळी डीवायएसपी राजेंद्र मायणे (चाकूर) यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
डीवायएसपी अक्षय जाधव यांनी ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रास्ताविकात पत्रकार शकील देशमुख यांनी पोलिसांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निश्चीतच प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis