
रायगड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। उपविभागीय अधिकारी (प्रांत) न्यायालय, अलिबाग येथे प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या अपिलांचा व दाव्यांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांच्या २७ ऑगस्ट २०२६ च्या आदेशानुसार, या न्यायालयात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे वेगाने निर्णयांकित केली जाणार असल्याची माहिती अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.
या अभियानांतर्गत अलिबाग येथील तहसील कार्यालयाच्या मागे असलेल्या उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात दोन टप्प्यांत लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली लोक अदालत ५ ऑक्टोबर २०२६ रोजी, तर दुसरी लोक अदालत ७ डिसेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत पार पडणार आहे. अलिबाग उपविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अलिबाग तसेच मुरुड तालुक्यातील सर्व पक्षकार आणि या न्यायालयातील मान्यवर विधिज्ञांनी प्रलंबित अपिले सामोपचाराने मिटवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही बाजूंच्या संमतीने किंवा समेटाने तोडगा निघणे शक्य आहे, अशा दाखल प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकार व वकिलांनी सुनावणीच्या दिवशी आपले लेखी म्हणणे न चुकता सादर करावे. दीर्घकाळ रखडलेल्या महसूल प्रकरणांचा जलद आणि विनाविलंब निकाल लागावा, तसेच नागरिकांचा वेळ व पैशांची बचत व्हावी यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. संबंधित पक्षकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपापली प्रकरणे मिटवून घ्यावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)