
नंदुरबार, 16 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि धोरणात्मक
निर्णयांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने नंदुरबार
जिल्ह्यात ‘लोकसंवाद-2026’ हे विशेष जनजागृती अभियान 16 ते 24 सप्टेंबर, 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे यांनी दिली आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने
नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना
संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-2026’चा प्रमुख उद्देश आहे. या
कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या स्थानिक तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी
नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
विविध विभागांच्या योजनांची माहिती
प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व मानाच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार
आहे. ‘लोकसंवाद-2026’मध्ये कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन,
सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण आदी विभागांसह सर्वच विभागांचा सहभाग
असणार आहे.
शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे, कृषी औजारांसाठी अनुदान, महिला बचत गट तसेच महिलांसाठी
उच्च शिक्षणाच्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षण, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती योजना सवलती यासह विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसह मोफत तपासणी, औषधोपचार व शिष्यवृत्तीशी संबंधित
सुविधांची माहिती देण्यात येणार आहे.
कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज
योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती आदी संस्थांच्या योजनांबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार
यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.
आंतरविभागीय समन्वयावर भर
‘लोकसंवाद-2026’ प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, क्रीडा व युवक
कल्याण, सहकार, पणन, कौशल्य विकास, सामाजिक न्याय तसेच पोलीस विभागासह संबंधित यंत्रणांशी
समन्वय साधण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये स्थानिक क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ प्रत्यक्ष गणेशोत्सव
मंडळांच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांना थेट आणि अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी
शक्य असेल तेथे कार्यक्रमांचे फेसबुक किंवा युट्यूब लाईव्ह करण्यात येणार असून, सोशल मीडियावर
#गणेशोत्सव२०२६ आणि #लोकसंवाद२०२६ हे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंतही योजनांची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात
येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त गणेश मंडळ, नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर