
लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून अनेक भागांत पिके वाळून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर शिरूर अनंतपाळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख ५० हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष माधवराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
शिरुर अनंतपाळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख ५० हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी,
पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, यांचा समावेश आहे. तसेच शेतीसाठी दिवसा आठ तास उच्च दाबाने थ्री-फेज वीजपुरवठा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. पावसाअभावी शेतीसोबतच पशुधनाच्या चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, अशी मागणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. यावेळी माधवराव बिरादार, मंगेश पाटील, गोविंदराव चिलकुरे, तुळसाबाई जगदीप लोंढे आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis