
मुंबई , 16 सप्टेंबर (हिं.स.)।गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी, कसब व समृद्धीचे प्रतीक. या देवतेचा उत्सव आपण नेहमीच उत्साह, आनंद आणि भक्तीभावाने साजरा करतो. यावर्षी आपल्या मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ५३ वर्षे पूर्ण होत असून, “शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता” या नावाने हा उत्सव दादर येथे सर्वत्र प्रसिद्ध आहे.
गणेशोत्सवाचा मूळ हेतू केवळ धार्मिक उत्सव साजरा करणे नसून, सामाजिक प्रबोधन घडवणे हा आहे. आपल्या मंडळाचा समाजातील विविध प्रश्नांकडे सकारात्मक आणि विधायक दृष्टिकोनातून पाहत, गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा मंडळाचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे.
आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी एकच वाक्य नेहमी ऐकायला मिळते — “वेळच मिळत नाही.” कुटुंबासाठी वेळ नाही, निसर्गासाठी वेळ नाही, समाजासाठी वेळ नाही, स्वतःसाठीही वेळ नाही. मात्र, जर आपण आपल्या दिवसातील केवळ एक मिनिट योग्य कारणासाठी दिले, तर त्या एका मिनिटातून निर्माण होणारा बदल किती मोठा असू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे.याच विचारातून यंदा “शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता” आपल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक अत्यंत साधा, पण प्रभावी संदेश घेऊन आपल्या भेटीला येत आहे.“१ मिनिट निसर्गासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी” ही संकल्पना आणि सजावट कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील यांची आहे.
एक मिनिट म्हणजे फार मोठा वेळ नाही. पण कोट्यवधी लोकांनी आपल्या दिवसातील फक्त एक मिनिट निसर्गासाठी दिले, तर त्यातून निर्माण होणारा परिणाम निश्चितच मोठा असेल.दिवसातील केवळ एक मिनिट वीज वाचवण्यासाठी दिवे बंद करणे, एक मिनिट पाणी वाचवण्याचा संकल्प करणे, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, एखादे झाड जपणे किंवा लावणे, अन्नाची नासाडी टाळणे — अशा छोट्या-छोट्या कृती प्रत्येक व्यक्तीने केल्या, तर त्या केवळ एका व्यक्तीपुरत्या मर्यादित राहत नाहीत.
एक व्यक्ती एक मिनिट देईल, तर तो एक छोटासा प्रयत्न असेल. पण हजारो, लाखो आणि कोट्यवधी लोकांनी आपापला एक मिनिट दिला, तर त्या छोट्या-छोट्या प्रयत्नांची बेरीज एक मोठा सामाजिक आणि जागतिक बदल घडवू शकते. “माझ्या एका मिनिटाने काय फरक पडणार?” या विचाराऐवजी “मी माझे एक मिनिट दिले तर बदलाची सुरुवात माझ्यापासून होईल” हा विचार समाजात रुजवणे, हाच यंदाच्या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे.
आपल्या सजावटीच्या माध्यमातून याच विचाराला विविध कल्पक आणि दृश्यात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वीज बचत, पाणी संवर्धन, स्वच्छता, पुनर्वापर, पुनर्चक्रण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी अशा विविध विषयांना एका मिनिटाच्या संकल्पनेशी जोडण्यात आले आहे.
आपला गणेशोत्सव हा केवळ सजावट, रोषणाई आणि उत्सवाचा सोहळा नसून, समाजाला काहीतरी सकारात्मक देण्याची एक संधी आहे. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्या मनातही एखादा छोटासा सकारात्मक संकल्प रुजावा आणि तो आपल्या कृतीतून पुढे जावा, हीच “शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता”ची भावना असल्याचे मंडळाचे खजिनदार दर्शन मुसळे यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना आपली सामाजिक बांधिलकीही मंडळाने सातत्याने जपली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode