
सोलापूर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : कलेक्टर होण्यापूर्वी मी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होतो. सीए परीक्षेत टॉप रँक मिळवल्यानंतर विदेशात दरमहा साडेसहा लाख रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली. मात्र, सुरक्षित आणि चांगल्या पगाराची नोकरी असूनही मनाला समाधान मिळत नव्हते. त्याच काळात कलेक्टर होण्याचा सल्ला मिळाला. त्यानुसार तयारी करून तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालो. प्रशासकीय सेवा ही नोकरी म्हणून नव्हे, तर लोकसेवा म्हणून स्वीकारल्याने खऱ्या अर्थाने समाधान मिळाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रशासकीय सेवेत मालक होण्याऐवजी लोकसेवक बनावे, असा सल्ला सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी तसेच उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित बौद्धिक बँक व्याख्यानमालेत ‘माझे ध्येय, संघर्ष तसेच यश’ या विषयावर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पहिले पुष्प गुंफले. डॉ. फडकुले सभागृहात सुरू असलेल्या या व्याख्यानमालेचे यंदा ६१ वे वर्ष आहे.
यावेळी व्यासपीठावर रोटरीचे प्रांतपाल जयेश पटेल, व्याख्यानमाला समितीचे प्रेसिडेंट यल्लादास लचमापुरे, अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, रोटरीचे सचिव श्रीनिवास नंदाल, अध्यक्ष नरसिंह कनकी, सिद्धेश्वर गड्डम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल वंगा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की, प्रशासकीय सेवेची तयारी करताना काही महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ही नोकरी सेवा म्हणून स्वीकारून लोकांची सेवा करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. तसेच नवीन विषय स्वीकारण्याची आवड जोपासून तो आत्मसात करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी भाषेचे ज्ञानही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत स्थानिक भाषा शिकत नाही, तोपर्यंत संबंधित भागातील नागरिकांच्या अडचणी आणि समस्या योग्य पद्धतीने समजून घेता येत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्यांनी स्थानिक भाषा शिकण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड