
लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील प्रसिद्ध संजीवनी वनस्पती बेटावर उत्तर नक्षत्र यात्रेस प्रारंभ झाला आहे. १३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत ही यात्रा भरत असून, या काळात महाराष्ट्राच्या मराठवाड्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक तसेच इतर राज्यांतून मोठ्या संख्येने रुग्ण, भाविक, वैद्य आणि वनौषधींचा अभ्यास करणारे नागरिक वडवळ नागनाथ येथे दाखल होत आहेत. संजीवनी वनस्पती बेटाची ओळख दुर्मिळ औषधी वनस्पतींचे नैसर्गिक भांडार म्हणून आहे. या बेटावर विविध प्रकारच्या वनस्पती, पाला आणि औषधी फळे आढळतात.
पारंपरिक वैद्यकीय परंपरेनुसार या वनस्पतींचा उपयोग विविध आजारांवर केला जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उत्तर नक्षत्राच्या काळात या बेटाला विशेष धार्मिक तसेच औषधी महत्त्व प्राप्त होते. संजीवनी बेटावर आढळणाऱ्या विविध वनस्पतींमुळे हे ठिकाण केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून औषधी वनस्पतींच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जाते. स्थानिक वैद्य आणि जाणकारांकडून या वनस्पतींची माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण येथे येतात. दरम्यान, संजीवनी बेटाच्या वाढत्या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्या रुग्ण व भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्त्यांची सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि कायमस्वरूपी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
बेटावर आल्यानंतर काही रुग्ण तीन दिवससंजीवनी पाला व उपलब्ध औषधी फळांचे सेवन करतात. या काळात नेहमीचे अन्न न घेण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर चौथ्या दिवशी बेटावरून खाली आल्यानंतर काळ्यासाळीच्या भाताचे सेवन करण्याची पद्धत असल्याचे वैद्य सांगतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून, वनौषधींच्या सेवनामुळे विविध आजारांपासून आराम मिळतो, अशी श्रद्धा रुग्ण व स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे उत्तर नक्षत्राच्या कालावधीत संजीवनी बेटावर देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis