
पॅरिस / मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.) - भारताच्या अंतराळ आणि एरोस्पेस क्षेत्रातील दिग्गज उद्योजक तसेच FICCI च्या प्रतिनिधींसोबत पॅरिस येथे आयोजित संवाद कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी फ्रान्समधील अंतराळ क्षेत्रातील कंपन्या, स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
भारतीय दूतावासाच्या वतीने आयोजित 'वर्ल्ड स्पेस बिझनेसर वीक २०२६' च्या निमित्ताने आयोजित बैठकीत उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत बोलत होते. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते.
या विशेष संवाद कार्यक्रमात भारत-फ्रान्स अंतराळ क्षेत्रातील सहकार्याला उद्योग-ते-उद्योग, स्टार्टअप-ते-स्टार्टअप आणि व्यवसाय-ते-व्यवसाय या स्तरावर अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे मत उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
भारताचे अंतराळ क्षेत्र सध्या ऐतिहासिक परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असून, खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्ससाठी या क्षेत्रातील संधी मोठ्या प्रमाणात खुल्या झाल्या आहेत. भारतीय कंपन्या रॉकेट्स, उपग्रह, पृथ्वी निरीक्षण, जिओस्पेशियल तंत्रज्ञान, एव्हीओनिक्स तसेच इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करत आहेत. या परिवर्तनात महाराष्ट्राला महत्त्वाची भूमिका बजावायची असल्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
“महाराष्ट्राला केवळ भारताची आर्थिक आणि औद्योगिक राजधानी म्हणून नव्हे, तर भविष्यातील तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट ध्येय आहे,” असे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
SpaceTech गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची सक्षम परिसंस्था
महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ अंतर्गत राज्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि रोजगारनिर्मितीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. महाराष्ट्रात आज मोठ्या संख्येने DPIIT-मान्यताप्राप्त स्टार्टअप्स असून, राज्याच्या स्टार्टअप परिसंस्थेला बळ देण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा ‘महा-फंड’ उभारण्यात आला आहे.
नवी मुंबई येथे सुमारे ३०० एकर क्षेत्रावर ‘इनोव्हेशन सिटी’ विकसित करण्यात येत असून, स्टार्टअप्स, कॉर्पोरेट्स, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था आणि सरकारी यंत्रणा यांना एकाच परिसंस्थेत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. AI, DeepTech आणि SpaceTech यांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रांवर येथे विशेष भर दिला जात आहे.
मुंबई आणि पुणे यांसारखी जागतिक दर्जाची शहरे, मजबूत उत्पादन व तंत्रज्ञान क्षेत्र, कुशल मनुष्यबळ, विद्यापीठे, गुंतवणूकदार आणि गतिमान स्टार्टअप परिसंस्था यामुळे महाराष्ट्र हे SpaceTech आणि Aerospace क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी आदर्श ठिकाण असल्याचे डॉ. उदय सामंत यांनी यावेळी नमूद केले.
फ्रेंच कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन
भारत आणि फ्रान्स यांच्यात अंतराळ क्षेत्रात दीर्घकाळापासून मजबूत सहकार्य आहे. या सहकार्याला आता अधिक व्यापक व्यावसायिक स्वरूप देण्याची गरज असून, फ्रेंच कंपन्यांनी भारतातील गुंतवणूक आणि विस्तारासाठी महाराष्ट्राला पसंतीचे ठिकाण मानावे, असे आवाहन उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी केले.
“फ्रेंच कंपन्यांनी महाराष्ट्रात यावे, मुंबई आणि पुण्यातील आमच्या परिसंस्थेचा अनुभव घ्यावा, आमच्या कंपन्या, स्टार्टअप्स, संस्था आणि सरकारी यंत्रणांशी संवाद साधावा. त्यांच्या गरजा आम्हाला सांगाव्यात; महाराष्ट्र सरकार त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय कंपन्यांनीही महाराष्ट्राला जागतिक बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी आधार म्हणून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.
फेब्रुवारी २०२७ मध्ये मुंबईत ‘Maharashtra SpaceFest’
महाराष्ट्राच्या SpaceTech क्षेत्रातील क्षमता आणि संधी जगासमोर आणण्यासाठी फेब्रुवारी २०२७ मध्ये मुंबई येथे ‘Maharashtra SpaceFest’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी दिली.
“SpaceFest हा केवळ आणखी एक परिषद किंवा कार्यक्रम न राहता त्यातून प्रत्यक्ष व्यवसाय, गुंतवणूक आणि भागीदारी निर्माण व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. मुंबईतून नवीन गुंतवणूक, नवीन भागीदारी, नवीन तंत्रज्ञान आणि भारत-फ्रान्समधील नवीन व्यावसायिक संधी निर्माण व्हाव्यात,” असे सामंत यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी फ्रान्समधील अंतराळ क्षेत्रातील कंपन्या, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधींना Maharashtra SpaceFest मध्ये सहभागी होण्याचे विशेष निमंत्रण दिले.
“मुंबईत येताना केवळ पाहुणे म्हणून येऊ नका; भागीदार म्हणून या. तुमच्या कल्पना, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव घेऊन या. भारताकडे प्रतिभा आहे, बाजारपेठ आहे आणि महत्त्वाकांक्षा आहे. या महत्त्वाकांक्षेचे संधीत रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली परिसंस्था महाराष्ट्राकडे आहे,” असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
भारत-फ्रान्स अंतराळ क्षेत्रातील सहकार्याला महाराष्ट्राच्या माध्यमातून नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करताना “महाराष्ट्रात या, मुंबईत या आणि आपण मिळून भारताच्या अंतराळ क्षेत्रातील पुढील अध्याय घडवूया,” असे आवाहन उद्योगमंत्री सामंत यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी