
नंदुरबार, 16 सप्टेंबर (हिं.स.) आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत,
यासाठी अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार विभागाच्या वतीने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात
येत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने नंदुरबार, शहादा व खांडबारा येथे विविध
ठिकाणी तपासणी करून भेसळीच्या संशयावरून पेढा, मोतीचूर लाडू, मावा, कलाकंद यासह विविध दुग्धजन्य
पदार्थांचा एकूण 210 किलो वजनाचा, सुमारे 85 हजार रुपये किमतीचा साठा जप्त करून नष्ट केला आहे. अशी
माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे यांनी दिली आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या पार्श्वभूमीवर
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता व सुरक्षितता तपासण्यासाठी
प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने
संशयित ठिकाणी तपासणी केली.
तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण होण्यासह विहित मानकांचे
उल्लंघन व स्वच्छतेचा अभाव आढळून आला. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत कारवाई
करत सुमारे 85 हजार रुपये किमतीचा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला साठा मानवी सेवनासाठी असुरक्षित, निकृष्ट दर्जाचा अथवा भेसळयुक्त असण्याची
शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने तो नष्ट करण्यात आला. तसेच जप्त केलेल्या
अन्नपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्ती अथवा विक्रेत्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके
कायदा, 2006 अंतर्गत नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांनी मिठाई, मावा तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना अधिकृत व
परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. खरेदी केलेल्या पदार्थाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा
कुठेही अन्नभेसळ होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा,
असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर