
बीड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपट्टा भागातील बहुतांश खरीप पिके पावसाअभावी कोमेजून गेली असून, जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडूनशेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने अंबाजोगाई महसूल प्रशासनाच्या वतीने चिचखंडी परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करण्यात आली.
यावेळी अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके करपल्याचे प्रशासनाच्या पाहणीत निदर्शनास आले. या पाहणी दौर्यात अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, तालुका कृषी अधिकारी पवार, मंडळ अधिकारी मगर, तलाठी पाचापुरे, कृषी सहाय्यक कांबळे, चिचखंडीचे उपसरपंच अशोकराव गडदे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, महसूल प्रशासनाने कोरड्या दुष्काळाच्या परिस्थितीचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई अथवा आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis