नामस्मरणातच खरे सुख-समाधान; जयदत्त क्षीरसागर
बीड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। वारकरी संप्रदायात श्रद्धा आणि भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व असून, येथे जात-धर्मापेक्षा प्रत्येकाकडे ‘भाविक भक्त’ म्हणून पाहिले जाते. अठरा पगड जातींचे वारकरी एकत्र येऊन वारीची परंपरा जोपासतात. भक्तीच्या या वाटेवर कोणताही भेद
जयदत्त क्षीरसागर


बीड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। वारकरी संप्रदायात श्रद्धा आणि भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व असून, येथे जात-धर्मापेक्षा प्रत्येकाकडे ‘भाविक भक्त’ म्हणून पाहिले जाते. अठरा पगड जातींचे वारकरी एकत्र येऊन वारीची परंपरा जोपासतात. भक्तीच्या या वाटेवर कोणताही भेदभाव नसून, खऱ्या अर्थाने सुख आणि समाधान नामस्मरणातच आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

संत सितारामबाबा यांच्या तपोपूर्ती पुण्यतिथीनिमित्त सिताराम गडावर आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतमय श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्षीरसागर यांनी वारकरी संप्रदायाच्या समता आणि बंधुभावाच्या विचाराचे महत्त्व विशद केले.

दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात. पांडुरंगाच्या दर्शनासोबतच नामस्मरणातून त्यांना आध्यात्मिक समाधान मिळते. भक्ती, श्रद्धा आणि समतेचा हा विचार समाजाला एकत्र बांधणारा असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

सिताराम गडाच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व प्रयत्नांना सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. गडाच्या विकासासाठी जे जे शक्य आहे, ते करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांच्या हस्ते भागवत ग्रंथाची आरती करण्यात आली. मठाधिपती ह.भ.प. महंत महालिंग महाराज, भागवत कथाकार ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, नरहरी महाराज पवार, नाना महाराज कदम, हरीदास महाराज, दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे, नवनाथ कुलकर्णी, डॉ. महेश गोलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

धार्मिक सोहळ्यासाठी खर्डा आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande