जळगाव जिल्ह्याचा जलसाठा ८० टक्क्यांवर; भोकरबारी, मन्याडकडे लक्ष
जळगाव, 18 सप्टेंबर (हिं.स.)। यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव जाणवत असला, तरी जळगाव जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा निर्माण झाला आहे. पारोळा तालुक्यातील एकेकाळी तळ गाठलेल्या भोकरबारी धरणात ३० व ३१ जुलै तसेच गेल्या
जळगाव जिल्ह्याचा जलसाठा ८० टक्क्यांवर; भोकरबारी, मन्याडकडे लक्ष


जळगाव, 18 सप्टेंबर (हिं.स.)। यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव जाणवत असला, तरी जळगाव जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा निर्माण झाला आहे. पारोळा तालुक्यातील एकेकाळी तळ गाठलेल्या भोकरबारी धरणात ३० व ३१ जुलै तसेच गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जलसाठा ५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पाची स्थिती अद्याप अपेक्षेप्रमाणे सुधारलेली नसून, या प्रकल्पात सध्या सुमारे ४७ टक्के जलसाठा आहे.

नांदगाव येथील माणिकपुंज धरणात सुमारे ८५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे माणिकपुंजमधून मन्याड प्रकल्पाकडे होणारा पाण्याचा प्रवाह सध्या बंद झाला आहे. परिणामी मन्याडच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प समाधानकारक पातळीवर पोहोचले असले, तरी भोकरबारी आणि मन्याड या दोन प्रकल्पांकडे अद्याप पाण्याच्या दृष्टीने लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्ह्यात ३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर गिरणा, अंजनीसह अनेक प्रकल्प ओसंडून वाहू लागले. मात्र, त्या वेळी भोकरबारी आणि मन्याड हे प्रकल्प अपेक्षित पातळीपर्यंत भरले नव्हते. म्हसवे तलाव पूर्ण भरल्यानंतर त्यातून वाहून जाणारे पाणी भोकरबारी धरणात पोहोचते. त्याचप्रमाणे मन्याड प्रकल्पाच्या जलसाठ्यासाठी नांदगावच्या माणिकपुंज धरणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. यंदा म्हसवे आणि माणिकपुंज हे दोन्ही प्रकल्प उशिराने भरल्याने त्याचा परिणाम भोकरबारी आणि मन्याडच्या जलसाठ्यावर झाला आहे.

दरम्यान, यंदा आतापर्यंत जिल्ह्यातील गिरणा, अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा आणि बोरी हे सात प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले आहेत. मोर प्रकल्पात ९५ टक्के, तर बहुळा प्रकल्पात २४ टक्के जलसाठा असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, यंदा १०० टक्के भरलेल्या प्रकल्पांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असली, तरी जिल्ह्याचा एकूण जलसाठा मात्र अधिक आहे. गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण ७६.११ टक्के जलसाठा होता. यंदा याच कालावधीत तो ८०.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण जलसाठ्याच्या दृष्टीने स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र आहे. मात्र, भोकरबारी आणि मन्याड हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी पाण्याची आवश्यकता आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande