
रायगड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात १२ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी ५०० ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करून संबंधित ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त श्रीकांत पां. कोकाटे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांमधील विविध रिक्तपदे आणि ॲप्रेंटिसशिपच्या संधींसाठी या रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा इंजिनिअर, पदवीधर इंजिनिअर, फार्मसी पदवीधर तसेच इतर पदवीधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
ऑनलाइन नोंदणी आवश्यक
नोकरी इच्छुक उमेदवारांनी महास्वयम् रोजगार संकेतस्थळावर नोंदणी करून आपली शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी. त्यानंतर Employment – Job Seeker (Find A Job) – Job Seeker Login या क्रमाने जाऊन ‘Pandit Dindayal Upadhyay Job Fair’ हा पर्याय निवडावा. त्यात रायगड जिल्हा निवडून Vacancy Listing – I Agree या पर्यायातून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.याशिवाय उमेदवारांनी Job Seeker Registration Form भरून प्राथमिक माहिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वयंरोजगारासाठीही मार्गदर्शन
रोजगार महाकुंभात नवउद्योजकांसाठी विविध महामंडळांच्या कर्ज योजनांची माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मोफत कौशल्य प्रशिक्षणाची माहितीही उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरीबरोबरच स्वयंरोजगाराच्या इच्छुक युवकांनाही या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
रायगडमधील १२ केंद्रे
रोजगार मेळावे पुढील ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत—
अंजुमन आय इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पस, नवीन पनवेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव
आयटीएम कौशल्य विद्यापीठ, खारघर, ता. पनवेल
शेठ जे. एन. पालीवाला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाली,सुधागड
यादवराव तासगावकर तंत्रनिकेतन महाविद्यालय, चंधाई, ता. कर्जत
भारतीय एज्युकेशन सोशल/चॅरिटेबल ट्रस्ट, वेलशेत, ता. रोहा
के.टी.एस.पी.एम. बी.एल. पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय, खोपोलीएम.जी.एम. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कामोठे, नवी मुंबई
डॉ. पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालय, पेण
जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, खारघर,पनवेल
श्रीमती गीता ङि. तटकरे तंत्रनिकेतन महाविद्यालय, गोवे, ता. रोहा
ऑनलाइन अर्ज करताना अडचणी आल्यास रायगड जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 02141-222029 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच कनिष्ठ कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी राहुल वि. गुल्हाणे (7020758701) आणि लिपिक टंकलेखक म. भा. वखरे (9421613757) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)