
जळगाव, 18 सप्टेंबर (हिं.स.)। माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ बाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती वैशाली चव्हाण यांनी दिली.
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ४ (१) (ख) नुसार निर्धारित माहिती सार्वजनिक करणे आवश्यक आहे. तसेच कलम ४ (२) व ४ (३) नुसार माहितीच्या प्रसाराची पद्धत निश्चित करण्यात आली आहे. सार्वजनिक प्राधिकरणांची कार्यपद्धती अधिक पारदर्शक करण्याबरोबरच नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज कमी व्हावी, यासाठी कलम ४ अंतर्गत आवश्यक माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे.
माहिती अधिकार दिवसाच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र आणि व्याख्यानमाला यांचा समावेश आहे. या स्पर्धा २८ सप्टेंबरपूर्वी घेण्यात येणार असून, त्यांचे निकाल माहिती अधिकार दिनी जाहीर केले जाणार आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि अशासकीय समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने समाजकार्यकर्ते तसेच इच्छुक गटांसाठी भिंतीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र आणि व्याख्यानमाला आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांसाठी स्थानिक पातळीवर लॉयन्स क्लब, रोटरी क्लब तसेच विविध समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने पारितोषिकांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही वैशाली चव्हाण यांनी सांगितले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर